सध्या संवादाच्या साधनांची मागणी वाढत आहे. आजच्या संगणक युगात सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांचा आलेख पाहिला तर तो वाढतच असल्याचे दिसत आहे. खाजगी कंपन्या आपल्या वस्तूंची माहिती, विक्री करण्यासाठी स्वतंत्र मोबाइल एप्लिकेशन तयार करताना आपण पाहतो किंबहुना ते वापरतोही. अशा अॅपच्या माध्यमातून वस्तूंची इत्थंभूत माहिती समाजात पोहोचविण्याचे कार्य होत आहे. याच पद्धतीने शेतीशी निगडीत असलेल्या पशुपालन व्यवसायाची व्याप्ती पाहून, शेतकरी व पशुपालकांना दुधाच्या उत्पादन वाढीसाठी पशुआहार व खाद्याविषयी सल्ला आणि कोणता आहार द्यावा, अशा आहार संतुलन कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी राष्ट्रीय विकास डेअरी बोर्ड यांनी 'पशुपोषण मोबाइल एप्लिकेशन' कार्यान्वित केले आहे. या मोबाइल एप्लिकेशन विषयी थोडंसं… हे मोबाइल एप्लिकेशन पशुपालकांनी गुगल प्ले स्टोअरवरुन अंड्राईड मोबाईलवर डाऊनलोड करुन घ्यावे. नोंदणी करण्यासाठी साइन अप येथे क्लिक करावे आणि शेतकऱ्याने नाव, गाव, तालुका, जिल्हा, मोबाइल क्रमांक आदी माहिती भरावी. यानंतर नोंदणी या बटणवर क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर मोबाइलधारक शेतकऱ्याला एसएमएसच्या स्वरुपात कोड क्रमांक प्राप्त होईल. हा कोड समाविष्ट करुन लॉग इन आयडी व पासवर्ड तयार होईल. लॉग इन आयडी व पासवर्ड प्रविष्ट केल्यानंतर ‘पशुपोषण मोबाइल एप्लिकेशन’चे मुख्य पान उघडते. या मोबाइल एप्लिकेशनच्या माध्यमातून शेतकरी अथवा पशुपालकांना पशु नोंदणी, आहार संतुलन आणि रिपोर्ट अहवाल या उपशिर्षकाच्या माध्यमातून माहितीचा स्त्रोत उपलब्ध करुन देण्यात आला आहे. पशु नोंदणी उपशिर्षकास क्लिक केल्यानंतर पशु नोंदणीसाठी बाराअंकी टॅग क्रमांक अनिवार्य आहे. यानंतर शेतकरी व पशुपालकांनी आपल्या जनावरांच्या नोंदणीसाठी आवश्यक असणारी माहिती भरावी. या माहितीमध्ये गाय, म्हैस, जात, वय, वेताची संख्या आणि सध्याची दूध देण्याची स्थिती असा तपशील भरावा. पशु नोंदणी केल्यानंतर आहार संतुलन येथे क्लिक करावे. आहार संतुलनासाठी पशुचा तपशील, दूध उत्पादन आणि दुधाच्या फॅटचा तपशील भरावा. दुभत्या जनावरांना सध्या देण्यात येणाऱ्या आहार व खाद्याचा तपशील भरल्यानंतर आहार संतुलन बटणवर क्लिक करावे. यानंतर संतुलित आहारविषयी सल्ला, कोणता आहार कधी द्यावा व त्याची मात्रा किती असावी याचा तपशील डाऊनलोड होईल. तो जतन करावा.पशुपालनाविषयी अन्य माहिती व विविध योजना आदी माहितीसाठी http://inaph.nddb.coop या संकेतस्थळास भेट द्यावी.लेखक - गजानन पाटील प्रतिवेदक. स्त्रोत : महान्युज