राज्यातील मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारसी, जैन आणि ज्यु या अल्पसंख्याक समाजामधील इच्छुक उमेदवारांना शासनामार्फत विनामूल्य पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अल्पसंख्याक समाजामधील उमेदवारांकडून प्रशिक्षणासाठी अर्ज मागविण्यात येत असून या संदर्भातील निवड चाचणीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थींचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. सहा लाख पेक्षा जास्त नसल्याचा दाखला असावा. उमेदवार मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारसी, जैन आणि ज्यु या अल्पसंख्याक समाजातील असावा. उमेदवाराचे वय 18 ते 28 या वयोगटातील असावे. उमेदवाराची उंची पुरुष 165 सेंमी व महिला 155 सेंमी, छाती पुरुष 79 सेंमी (फुगवून 84 सेंमी) असावी. उमेदवार इयत्ता बारावी उत्तीर्ण असावा. उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता, आधार कार्ड, इत्यादी कागदपत्रांच्या सत्यप्रती अर्जासोबत देणे आवश्यक राहील. उमेदवार शारीरिकदृष्ट्या निरोगी व सक्षम असावा. या प्रशिक्षणासाठी निवडलेल्या उमेदवारांना एकूण दोन महिने प्रशिक्षण दिले जाईल. या दरम्यान दररोज तीन तासांचे वर्ग प्रशिक्षण व दोन तासांचे मैदानी प्रशिक्षण देण्यात येईल. निवडलेल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थीस प्रशिक्षणादरम्यान रु. 1500/- प्रतिमाह प्रमाणे विद्यावेतन देण्यात येईल. तसेच प्रशिक्षणादरम्यान मैदानी प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण संस्थेमार्फत चहापान व अल्पोपाहार देण्यात येईल. निवडलेल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थीस गणवेश साहित्यासाठी रु. 1000/- एवढे एकरकमी अनुदान देण्यात येईल. तसेच त्यांना त्यांच्या निवासाची व्यवस्था स्वत: करावी लागेल. या प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांनी दिनांक 03 जानेवारी, 2017 रोजी सकाळी 10.00 वाजता मुंबई/मुंबई उपनगर – पोलीस परेड ग्राऊंड, नायगांव (दादर), मुंबई आणि इतर जिल्हे – जिल्हा मुख्यालयातील पोलीस परेड ग्राऊंड येथे अर्ज आणि सर्व कागदपत्रांच्या छायाप्रतींसह उपस्थित राहावे. संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे सदर प्रशिक्षणासाठी उमेदवारांची निवड आणि अनुषंगिक सर्व कार्यवाही केली जाईल. पत्ताअल्पसंख्याक विकास विभाग,महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग,जे.जे.स्कूल ऑफ आर्टसच्या मागे,बद्रुद्दीन तय्यबजी मार्ग, सी.एस.टी.जवळ,मुंबई – 400 001.लेखक - देवेंद्र भुजबळ, संचालक(माहिती/वृत्त) स्त्रोत - महान्युज