मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे मुंबईतील चित्रपट जगत आणि फॅशनविषयक उपक्रमांमुळे ती फॅशनच्या दुनियेतील प्रवेशद्वार म्हणूनही ओळखले जाते. त्यामुळेच मुंबईजवळील नवी मुंबईतील खारघर येथे दि. 19 एप्रिल, 2006 रोजी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संकुलाचे उद्घाटन करण्यात आले. भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत ही स्वायत्त संस्था आहे. भारतातील फॅशनविषयक क्षेत्रात संस्थेने गेली 25 वर्षे मोलाचे योगदान दिले आहे. संस्थेतील विविध अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्यूमध्ये नोकरीची हमी मिळते. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये येथील विद्यार्थी निवडले जातात. त्यामुळे येथे प्रवेश मिळण्यासाठी चांगलीच स्पर्धा असते. या संस्थेत ॲक्सेसरी डिझाइन, फॅशन डिझाइन, निटवेअर डिझाइन, टेक्सटाईल डिझाइन, फॅशन कम्युनिकेशन, ॲपेरल प्रॉडक्शन यामधील पदवी अभ्यासक्रम शिकविले जातात. तर डिझाईनिंग आणि फॅशन मॅनेजमेंट या विषयात मास्टर कोर्स येथे उपलब्ध आहे. याशिवाय ॲपेरल प्रॉडक्शन ॲण्ड मर्कण्डडायझिंग, स्टोअर ऑपरेशन्स, फॅशन फंडामेन्टलस् फॉर द इंडस्ट्री हे पूर्ण वेळ पदविका अभ्यासक्रमही शिकविले जातात. संस्थेत डिझाईन स्टुडिओ, सुसज्ज वर्ग, अद्ययावत माहिती तंत्रज्ञानाचे शिक्षण, विद्यार्थिनींसाठी वसतिगृह, वाहतूक सेवा, कॅन्टिन, व्यायामशाळा आदी सुविधा उपलब्ध आहेत. संस्थेने पुढील शैक्षणिक वर्षासाठी, प्रवेशासाठी जाहिरात दिली असून दि. 10 जानेवारी, 2017 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचे आहेत. अधिक माहितीसाठी संस्थेच्या www.nift.ac.in या संकेतस्थळास भेट द्यावी. अधिक माहितीसाठी व अर्जाच्या नमुन्यासाठी पुढील ठिकाणी संपर्क साधता येईल.नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (वस्त्रोद्योग मंत्रालय, भारत सरकार)एनआयएफटी कॉम्प्लेक्स, प्लॉट नं. 15, सेक्टर -4,खारघर, नवी मुंबई - 410 210दूरध्वनी क्र.- 022-27747000/27747100फॅक्स- 022-27745386ईमेल- nift.mumbai@nift.ac.inलेखक - देवेंद्र भुजबळ, संचालक स्त्रोत - महान्युज