करिअरची नवनवीन क्षेत्रे विस्तारत आहेत. त्याचबरोबर रोजगार निर्मितीही मोठ्या प्रमाणात होते आहे. अनेक अपरिचित क्षेत्रे विद्यार्थ्यांना माहित नसल्याने बऱ्याचदा त्यांचे नुकसान होत असते. पारंपारिक क्षेत्रांशिवाय अनेक इतर शाखांमध्ये सुद्धा आता करिअर करणे शक्य झाले आहे. बऱ्याचदा विद्यार्थ्यांचा कल विज्ञान शाखेकडे असतो कारण या शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असतात. बहुतेक विद्यार्थी विज्ञान शाखेच्या अनेक उपशाखांमध्ये शिक्षण घेताना दिसतात. त्यापैकीच फार्माकोव्हिजिलन्स हे एक नवे क्षेत्र आहे. फार्माकोव्हिजिलन्स म्हणजे काय ? हे क्षेत्र फारशे परिचयाचे नसले तरी फार्मसी या औषधनिर्मिती संबंधी क्षेत्रातीलच हा भाग म्हणजे फार्माकोव्हिजिलन्स होय. यात औषधांची उपलब्धता, वितरण, वापर आणि त्याच्याशी निगडित अनेक समस्या कमी करण्याशी संबंधित अभ्यासक्रम असतो. त्याचसोबत औषधांच्या वापराशी निगडित वाईट परिणाम ओळखणे, त्याची पुष्टी देणे आणि परिणामांची मोजमाप करणे हे देखील त्यांच्या कामामध्ये समाविष्ट असते. जेणे करून औषधे अधिक सुरक्षित आणि उपयोगी बनवता येऊ शकतील. एकंदरीत औषधांचे विपरित परिणाम ओळखणारे तज्ज्ञ या क्षेत्रात निर्माण केले जातात. या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना परदेशातही रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. अावश्यक पात्रता या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असल्यास बॉटनी, झुलॉजी, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, जेनेटिक्स, बायोटेक यापैकी कुठल्याही विषयातून पदवी अथवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असणे गरजेचे असते. तसेच पदवी अथवा पदव्युत्तर शिक्षणात ५० टक्के गुण असणे आवश्यक असते. रसायनशास्त्र हा विषय घेऊन पदवी घेतलेले विद्यार्थी देखील या अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतात. मात्र यामध्ये देखील ५० टक्के गुणांची अट गरजेची आहे. या व्यतिरिक्त फार्मसी आणि मेडिसिन या विषयातून पदवी घेणारे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात. उपलब्ध कोर्स या क्षेत्रात करिअर बनविण्याची इच्छा असणारे विद्यार्थी सर्टिफिकेट आणि डिप्लोमा अशा दोन्ही प्रकारचे कोर्स करू शकतात. फार्माकोव्हिजिलन्स आणि फार्माकोइपीडेमियोलॉजी या विषयातील सर्टिफिकेट कोर्स चार महिन्यांचा असतो. अशा प्रकारचा कोर्स सिमोजेन इंडिया यांच्यातर्फे राबविला जातो. पदव्युत्तर डिप्लोमा अथवा डिग्री करायची असल्यास असा अभ्यासक्रम एक वर्षाचा असतो. अशा प्रकारचा कोर्स इन्स्टिट्युट ऑफ क्लिनिकल रिसर्च इंडिया यांच्यातर्फे राबविला जातो. या शाखेत शिकविले जाणारे विषय फार्माकोव्हिजीलेन्स या कोर्सअंतर्गत पुढील विषय शिकविले जातात. बेसिक प्रिन्सिपल ऑफ फार्माकोव्हिजिलन्स, रेग्युलेशन इन फार्माकोव्हिजीलन्स, फार्माकोव्हिजीलन्स इन क्लिनिकल रिसर्च, ड्रग रिॲक्शन, मॅनेजमेंट ऑफ फार्मेकोव्हिजीलन्स डाटा, रिस्क मॅनेजमेंट इन फार्माकोव्हिजीलन्स, फार्माकोइपिडेमीयोलॉजी इत्यादी. प्रवेशप्रक्रिया विद्यार्थ्याला प्रथम लेखी परीक्षा द्यावी लागते. त्यानंतर वैयक्तिक मुलाखत आणि स्क्रिनिंग नंतर निवड होत असते. हे क्षेत्र सध्या नवे आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना याबाबत माहितीदेखील नाही. पण तरीही सध्या या क्षेत्रात करिअरच्या चांगल्या संधी आहेत. नोकरीच्या संधी फार्माकोव्हिजीलन्स संबंधित कोर्स केल्यानंतर विद्यार्थी फार्मास्युटिकल्स कंपन्यांमध्ये नोकरी शोधू शकतात. अलिकडच्या काळात रोजगार देण्याच्या दृष्टीने फार्मा क्षेत्र अधिक खुले असल्याचे दिसते. या क्षेत्रात सुरुवातीला विद्यार्थ्यांना १५ ते २० हजार रुपये प्रतिमहिना वेतन मिळते. मात्र अनुभवानंतर ते वाढत जाते. काही काळ अनुभवानंतर ३० ते ३५ हजार वेतन मिळू शकते. अभ्यासक्रम राबविणाऱ्या संस्था : सिमोजेन इंडिया, द इन्स्टिट्युट ऑफ केमिकल रिसर्च इंडिया, नवी दिल्ली, मुंबई, बंगळूरू, अहमदाबाद. अधिक माहितीसाठी http://isoponline.orgया संकेतस्थळास भेट द्यावी. औषधनिर्मिती क्षेत्रात उपलब्ध होणाऱ्या संधी आणि उत्तम वेतन अशा सुविधा मिळत असल्याने या क्षेत्रात करिअर करणे फायद्याचे ठरेल. परदेशात जाण्याची तयारी असेल तर तिथेही करिअरसाठी मोठ्या प्रमाणात संधी आहेत.लेखक - सचिन पाटील स्रोत - महान्युज