मानवाच्या जगण्यामध्ये कला, संस्कृती, साहित्य, विज्ञान ही क्षेत्रे महत्त्वाचे योगदान देतात. करिअरची वाट निवडताना चाकोरीबद्ध क्षेत्राच्या पलीकडेही अनेक शाखा विस्तारत आहेत. दिवसेंदिवस त्या क्षेत्रात निर्माण होणाऱ्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. त्यापैकीच कलेचे हे क्षेत्र देखील आहे. जगभरातील माध्यमे विस्तारत असताना कलेला अत्यंत महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसते. पूर्वी ‘चित्रे काढून पोट भरत नाही’ असा एक सूर असायचा पण आता चित्रकार देखील आर्थिकदृष्ट्या चांगले स्थैर्य मिळवू शकतो. भारतीय संस्कृतीमध्ये कलेला अत्यंत महत्त्व आहे. अनेक वर्षाचा प्रदीर्घ असा वारसा आपल्याला मिळालेला आहे. तंत्रज्ञान आणि कला याचा सुरेख संगम साधून मानवी जीवनाला नवे आयाम दिले जात आहेत. रोजच्या व्यवहारामध्ये आपल्याला अनेक गोष्टी नजरेस पडतात. उदा. दुकानाचे बोर्ड, नावाच्या पाट्या, पोस्टर, सूचना फलक, विविध वस्तूंच्या जाहिराती, दिसत असतात. शाळा, हॉस्पिटल, कार्यालये, कंपन्या, व्यापार अशा सर्वच बाबतीत कलेचा वापर अनिवार्य असतोच. कलेचे हे क्षेत्र व्यापक असून त्यात अनेक उपशाखा आहेत. त्यातील जी.डी.आर्ट या क्षेत्रातील करिअर विषयी माहिती या लेखात घेणार आहोत. पात्रता कला महाविद्यालयामध्ये फाऊंडेशन अभ्यासक्रम उपलब्ध असतो. तो केल्यानंतर जी.डी. आर्ट अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळतो. या अभ्यासक्रमाकरिता विद्यार्थी कमीत कमी ४५ टक्क्यांपेक्षा जास्त मार्क मिळवून १० वी एस्.एस्.सी. परीक्षा पास असावा. तसेच तो कलासंचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत घेण्यात येणारी एलीमेंट्री आणि इंटरमिजीएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा पास असावा. या अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षाचा असतो. कामाच्या संधी कलेतील व्यावसायिक शिक्षण घेऊन विविध जाहिरात कंपन्यात काम मिळू शकते. विविध वर्तमानपत्रे, मासिके, टेलीव्हिजन, कलाकुसरीच्या वस्तू डिझाईन करणाऱ्या संस्थामध्ये नोकरी करता येते. पुस्तक प्रकाशन संस्थेतही संधी उपलब्ध असतात. कामाचा उत्तम दर्जा, नाविन्यपूर्णता आणि अनुभवाच्या जोरावर किमान चाळीस हजार वेतन घेऊ शकता. तसेच उपलब्ध आर्ट गॅलरीच्या माध्यमातून आपण आपल्या कलाकृतीची प्रदर्शने भरवू शकता. प्रशिक्षण संस्था एल.एस.रहेजा कॉलेज ऑफ आर्टस्, वांद्रे, बी.के.सोमाणी पॉलिटेक्निक, सोफिया कॉलेज कॅम्पस, भुलाभाई देसाई मार्ग, मुंबई. शासकीय चित्रकला महाविद्यालय, नागपूर, शासकीय कला महाविद्यालय, औरंगाबाद, रा.शी.गोसवी कलानिकेतन महाविद्यालय कोल्हापूर.एकंदरीत कष्ट करण्याची तयारी तसेच कला क्षेत्रातील नवनवीन गोष्टी कालानुरूप आत्मसात केल्यास या क्षेत्रात उज्ज्वल भविष्य निर्माण करता येते. त्यासाठी अभ्यासाची क्षमता आणि कल्पकता विद्यार्थ्याच्या ठायी असायला हवी. चला तर मग कलेसाठी कला आशय लक्षात घेऊन या क्षेत्रात करिअर करूया.लेखक - सचिन पाटील स्त्रोत - महान्युज