राष्ट्रीय डिजीधन मेळावा ‘पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय’ चा उपक्रम घरातील गॅस सिलेंडर संपल्यावर होणारी दगदग, गॅस सिलेंडर घरी पोहोचल्यानंतर पैसे शोधण्यासाठी होणाऱ्या त्रासातून सुटका मिळावी म्हणून भारत सरकारच्या ‘पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय’तर्फे ग्राहकांना ‘इझी गॅस कार्ड’ देण्यात येत आहे. घरी सिलेंडर पोहोचविणाऱ्या व्यक्तीकडे असलेल्या इझी टॅप्प मशीनमधून आपले क्रेडिट, डेबिट कार्ड स्वॅप करताच सिलेंडरची रक्कम अदा करता येणार आहे. भारत सरकारने सध्या कॅशलेस इंडियाकडे वाटचाल सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सर्वांना कॅशलेस संकल्पना आणि भारत शासनाच्या विविध अॅपबद्दल माहिती मिळावी या हेतूने मंगळवार दि.३ जानेवारीला मुंबई विद्यापिठाच्या प्रांगणात राष्ट्रीय डीजी धन मेळावा आयोजित केला होता. भारत सरकारने ऑनलाईन गॅस व्यवहार करण्यासाठी दोन वर्षांपासूनच सुरुवात केली आहे. आधार लिंक करून गॅस सबसिडी ग्राहकाच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात केली आहे. सध्या सुरु असलेल्या कॅशलेस व्यवहाराच्या चळवळीत भारत सरकारच्या ‘पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय’ने देखील सहभाग घेतला आहे. काय आहे संकल्पना गॅस सिलेंडर संपल्यावर ग्राहकांना विशेषतः महिलांना जास्त दगदग करावी लागते. गॅस नोंदणी करण्यापासून तर गॅस सिलेंडर घरी येईपर्यंत पैसे रोखीने देण्याचे कष्ट घावे लागतात. कॅशलेस इंडिया संकल्पनेअंतर्गत ‘इझी गॅस कार्ड’ तयार करण्यात आले आहे. आपल्या गॅस सिलेंडर विक्रेत्याकडे जावून नोंदणी केल्यास ते सहज उपलब्ध होते. ऑनलाईन गॅस नोंदणी केल्यावर घरी गॅस सिलेंडर येईल. गॅस सिलेंडर पोहोचविणाऱ्या व्यक्तीकडे ‘इझी टॅप’ मशीन असेल. त्या मशीनमधून आपले कार्ड स्वॅप केल्यावर ते सिलेंडर आपल्यालाच मिळाले, असे गृहीत धरण्यात येईल. त्यानंतर त्याच मशीनमधून आपले डेबिट किंवा क्रेडीट कार्ड स्वॅप केल्यावर तुमच्या खात्यातून ती रक्कम कपात होऊन गॅस सिलेंडर विक्रेत्याच्या खात्यावर वर्ग होईल. पेट्रोल, डिझेलचे पैसे द्यायलाही कार्ड भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमच्या सर्व पंपावर पेट्रोल आणि डिझेल आपल्या वाहनात टाकताना पैसे रोखीने द्यावे लागू नयेत म्हणून ‘पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय’ने पेट्रोकार्ड तयार केले आहे. ऑनलाईन नोंदणी केल्यावर कार्ड आपल्या घरी येते. त्यानंतर आपल्याला हवा तेवढा बॅलन्स त्या कार्डावर पाठवायचा आणि आपले कार्ड असेल त्या पंपावरून पेट्रोल, डिझेल आपल्या वाहनात भरता येणार आहे. लेखक - चेतन वाणी,संहिता लेखक. स्त्रोत - महान्युज