परिचय

‘पाहू द्या रे मज विठोबाचे रुप’ असे म्हणत टाळ-मृदुंगाच्या गजरात लाखो वारकरी विठु माऊलीच्या दर्शनासाठी आळंदीपासून पायी वारी करतात. भक्तिभावाने ओथंबलेल्या वातावरणात ‘ज्ञानोबा-माऊली’ चा जयघोष करीत, आषाढी एकादशीपूर्वी विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेत वारकऱ्यांची मार्गक्रमणा चालू असते. पारंपरिक पद्धतीने वारी जात असतानाच आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज समितीतर्फे निर्मलवारी आणि हरितवारी असे समाजाभिमूख कार्यक्रमही राबविण्यात येतात. यावर्षीची वारी आधुनिकतेचा वापर करणारी असणार आहे. जसजसा तंत्रज्ञानात बदल होत आहे तसे वारीही आधुनिक होऊ लागली आहे. आता वारीही मोबाईलच्या ‘ॲप’वर आली आहे.

मानवाचे जीवन सध्या वेगवेगळ्या ‘ॲप’ने व्यापले आहे. मोबाईलवरील ॲप आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. पालखी सोहळ्यानिमित्त दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाकडून केले जाणारे वारी व्यवस्थापन व नियोजन, वारकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयी, सुविधांची माहिती मिळावी यासाठी ‘पालखी सोहळा 2017’ हे मोबाईल ॲप विकसीत करण्यात आले आहे. या ॲपमध्ये दिंडी व्यवस्थापन, सुविधा आणि सूचना असे तीन विभाग करण्यात आले आहेत. या ॲपमध्ये विविध उपयोगी पर्याय देण्यात आले आहेत.

कसे असेल ‘ॲप’

आषाढी एकादशीपर्यंत पालखी सोहळ्यामध्ये वारकरी सहभागी होतात. या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना पालखी व्यवस्थापनासंदर्भात या ॲपद्वारे माहिती घेता येणार आहे.

अॅपच्या माध्यमातून श्री विठ्ठल-रुखुमाईचे चोवीस तास ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे.

हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

पुणे, सोलापूर आणि सातारा या तीनही जिल्ह्यातील पालखीच्या मार्गक्रमात देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती या ॲपमध्ये देण्यात आली आहे.

याबरोबरच देहू, आळंदी, पंढरपूर देवस्थानाच्या विश्वस्तांची, पालखी सोहळा प्रमुख, दिंडी प्रमुख, संबधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, तहसीलदार, आरोग्य केंद्र व त्यांचे प्रमुख.

नियंत्रण कक्षाची माहिती ॲपमध्ये देण्यात आली आहे.

दिंडीत सहभागी वारकऱ्यांना जिल्हा प्रशासनातर्फे पाण्याचे टँकर, आरोग्यविषयक लाभ, शिधा, रॉकेल, स्वयंपाकाच्या गॅसचे सिलेंडर इत्यादी पुरविण्यात येतात.

या आणि अन्य आवश्यक सुविधांची माहिती ॲपमध्ये उपलब्ध आहे.

दिंडीत सहभागी वारकऱ्यांची संख्या प्रचंड असते. एखादी व्यक्ती बेपत्ता असल्यास ‘आपण यांना पाहिलंत का ?’ या पर्यायाद्वारे त्याचा शोध घेणे ॲपद्वारे शक्य होणार आहे.

प्रशासनाशी संपर्क साधून पालखी सोहळ्यादरम्यान होणाऱ्या असुविधांबाबत ॲपच्या माध्यमातून तक्रारही नोंदविता येणार आहे.

दोन्ही पालख्यांची मार्ग निश्चिती, मुक्कामाचे ठिकाण यांची दिनांकासह माहिती.

शहर व जिल्हास्तरीय पोलीस अधिकाऱ्यांचे संपक क्रमांकासह इतर आवश्यक माहिती या ॲपमध्ये आहे.

वारकऱ्यांच्या सोयीसाठी हे एक परिपूर्ण ॲप आहे. आतापर्यंत जवळपास पंधराशे जणांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे. हे सर्व पाहता यंदाची पंढरीची वारी ॲप वरी, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

संकलन / लेखन : जयंत कर्पे, माहिती सहायक, जिल्हा माहिती कार्यालय, पुणे.

माहिती स्रोत: महान्युज